मुंबई : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात (Jiah Khan Suicide Case) अभिनेता आदित्य पांचोलीला (Aditya Pancholi) साक्षीदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली. आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली (Suraj Pancholi) या प्रकरणात मुख्य आरोपी असल्यामुळे आदित्य आपल्या मुलाला मदत करून त्याच्याविरुद्धचा खटला कमकुवत करेल, अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे साक्षीदारांच्या यादीतून वगळल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
2013 मध्ये जियाची आत्महत्या
2013 मध्ये जिया खानने आत्महत्या केली होती. सूरज पांचोलीने जियाची हत्या केल्याचा आरोप करून जियाची आई राबियाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. हा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आल्यावर सीबीआयने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जियाचा कथित प्रियकर म्हणून अभिनेता सूरज पांचोलीला अटक केली. सध्या सूरज जामीनावर आहे. विशेष एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी जियाच्या आईच्यावतीने करण्यात सत्र न्यायालयात आली आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
सूरज पांचोलीकडून साक्षीदाराची उलटतपासणी
मुंबई पोलिसांनी तपासादरम्यान आदित्य पांचोलीचा जबाब नोंदवला होता. तेव्हा, जियाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आपण तिच्या घरी गेल्याचे आदित्यने म्हटले होते. आदित्य आपल्या मुलाला मदत करून त्याच्याविरुद्धचा खटला कमकुवत करू शकतो म्हणून त्याचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी निश्चित केली. तेव्हा, सूरज पांचोलीकडून साक्षीदाराची उलटतपासणी करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत राबिया आणि जियाच्या बहिणीसह २१ साक्षीदारांनी न्यायालयात जबाब नोंदवला असून, सीबीआयने पांचोलीच्या घरात नोकर म्हणून काम करत असलेल्या एका साक्षीदाराला वगळले आहे.