मुंबई : 2024 साली लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Elections) सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, या तिन्ही पक्षांचं जागावाटप कसं होणार असा प्रश्न चर्चिला जातोय. 2019 च्या निवडणुकीत 48 पैकी 18 जागा शिवसेनेनं (Shivsena) मिळवल्या होत्या. त्या जागांवर शिंदे यांच्या बंडानंतरही ठाकरे गटानं दावा केलेला आहे. त्यातच काँग्रेसनं राज्यात केलेल्या सर्व्हेत काँग्रेसलाही राज्यात 21 मतदारसंघात पूरक स्थिती असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. अशी स्थितीत तिन्ही पक्षात जागावाटप होणार कसं असा प्रश्न निर्माण झालाय.
काय आहे काँग्रेसच्या सर्व्हेत?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं एक अहवाल पक्षश्रेष्ठींना दिल्याचं सांगण्यात येतंय. त्यात राज्यातील 48 पैकी 21 लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा यात करण्यात आलाय. तर विधानसभेसाठी राज्यात 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद चांगली असल्याचं सांगण्यात आलंय. या 21 जागी जर काँग्रेसनं आगामी काळात दावा केला, तर मविआतील जागावाटपात बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पुणे, कोल्हापूर, मुंबईतल्या दोन मतदारसंघांवरुन काँग्रेसचे आगामी काळात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी वाद होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय.
काँग्रेसचे 21 लोकसभा मतदारसंघ
1. नागपूर
2. चंद्रपूर
3. गडचिरोली
4. रामटेक
5. अकोला
6. वर्धा
7. अमरावती
8. यवतमाळ
9. धुळे
10. नंदूरबार
11. शिर्डी
12. नांदेड
13. हिंगोली
14. लातूर
15. पुणे
16. सोलापूर
17. कोल्हापूर
18. हातकणंगले
19. सांगली
20. दक्षिण मध्य मुंबई
21. उत्तर पश्चिम मुंबई
या मतदारसंघांत काँग्रेसची स्थिती चांगली असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.
कर्नाटक विजयानंतर काँग्रेस आक्रमक
कर्नाटक विधानसभेतील विजयानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतंय. अशा स्थितीत महाराष्ट्रात लोकसभा जागेसाठी काँग्रेस पूर्ण ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसची मागणी 21 पर्यंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत जागावाटपाचा तिढा सुटणार तरी कसा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय.