मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक वस्तू आणि पदार्थांचे दर वाढल्याचे दिसत आहे. टोमॅटो, लसूण यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आता गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. तूर डाळीचे दरही पाच वर्षात ४३ ते ६५ रुपये किलोवरून ९५ ते १३५ रुपये किलो झाले आहेत. देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
देशात काही प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे पुरेसे उत्पादन झालेले नाही. यावर्षी पेरण्या वेळेत झालेल्या नाहीत. यामुळे अन्नधान्य, डाळींचे दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे. डाळी व कडधान्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यामुळे चणा डाळ वगळता इतर सर्वच डाळींच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये सरासरी ४ हजार टन अन्नधान्य, डाळी, कडधान्याची आवक होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कृषी माल येथे विक्रीला येत आहे.