संगमनेर तालुक्यातील शिबलापूर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत एका वयोवृद्ध महिलेच्या गोठ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० शेळ्या आणि १ बोकड अशा एकूण ११ प्राण्यांचा मृत्यू झाला असून, सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी दि १७ रोजी दरम्यान, आश्वी बुद्रुक येथे सकाळी ८ वाजता सुमनबाई बाळासाहेब खेमनर यांच्यावरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. शिबलापूर-आश्वी रस्त्यावरील बोंद्रे वस्ती येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय लहानबाई मच्छिंद्र वनवे यांच्या गोठ्यावर बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. त्यांच्या घरामागील १० बाय १५ आकाराच्या पत्र्याच्या गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या.
चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही
बिबट्याने गोठ्याच्या पाठीमागील अरुंद फटीतून आत प्रवेश करून एकामागून एक प्राण्यांवर हल्ला चढवला. गोठा पूर्णपणे बंदिस्त असल्याने बिबट्याला बाहेर पडता न आल्याने तो पिसाळल्यासारखा वागला आणि त्याने ११ प्राण्यांचा जागीच बळी घेतला. तीन लहान कोकरे मात्र सुदैवाने बचावली. हल्ल्यानंतर बिबट्याने पाच शेळ्या जवळील ऊसाच्या शेतात ओढून नेल्या. घटनेनंतर सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे व ग्रामस्थांनी ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. यावेळी बिबट्याचा वावर दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.
लहानबाई वनवे या अत्यंत गरीब असून त्यांचा उदरनिर्वाह शेळीपालनावर अवलंबून आहे. स्वतःची शेती नसल्याने त्या इतरांकडून चारा आणून शेळ्यांचे पालन करत होत्या. एकाच रात्रीत त्यांचे सर्वस्व नष्ट झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे.
Tesla आणू शकते त्यांची सर्वात स्वस्त SUV, कधी होणार लाँच? जाणून घ्या एका क्लिकवर
परिसरात बिबट्याचे हल्ले वाढत असून, या आठवड्यातील हा चौथा हल्ला असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित बिबट्याला तातडीने पिंजरा लावून पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू असलेल्या शेळीपालन योजनेचा लाभ नुकसानग्रस्त लहानबाई वनवे यांना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.






