नगर-मनमाड रस्त्यावर 8 दिवसात 8 बळी!
नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील राहुरी शहराजवळील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता, दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले नाही, तर आठ दिवसांत मोठ्या रास्तारोको आंदोलनाचा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
राहुरी बसस्थानक चौकातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून मोठे खड्डे लपले जात आहेत. त्यामुळे दररोज अपघात घडत असून प्रवासी व शहरवासींना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. ठेकेदार कंपनीने कामाच्या निमित्ताने रस्ता खरडून काढल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या कपारी तयार झाल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघातांची संख्या वाढली आहे.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनाही प्रवासात अडचणी येत आहेत. त्यामुळे किमान राहुरी शहरातून जाणारा रस्ता तरी तातडीने दुरुस्त व्हावा, अशी मागणी नागरिक व स्थानिक नेते करत आहेत.
गेल्या आठ दिवसांत आठ नागरिकांचा या रस्त्यावर बळी गेला असून, यामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तनपुरे यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आठ दिवसांची मुदत दिली असून, “त्यानंतर आंदोलन अटळ राहील,” असा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राहुरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे. ठेकेदार कंपनीने खड्डे बुजवण्याऐवजी रस्ता खरडून टाकल्याने खडी बाहेर आली असून, नवीन कपारी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, अपघातांची संख्या वाढीस लागली आहे. दुचाकीस्वारांना कसरत करत रस्ता पार करावा लागत आहे, अशी विचित्र परिस्थिती वर्दळीच्या ठिकाणी निर्माण झाली आहे.
नगर–मनमाड रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये शेकडो नागरिक मृत्युमुखी, तर हजारो अपंग झाले आहेत. तरीही रस्त्याला लागलेले ‘ग्रहण’ दूर झालेले नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
या वेळी सागर तनपुरे, प्रदीप भुजाडी, ज्ञानेश्वर जगधने, धनंजय महसे, राजेंद्र बोरकर, मयूर शेळके, नामदेव हरिचंद्रे, पवन कारंडे, सागर काळे, रवी आहेर, अजहर खान, रफिक शेख, रवींद्र तनपुरे आणि प्रल्हाद ठंडे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.






