फोटो सौजन्य: Gemini
अहिल्यानगर जिल्ह्यातील बचत गटांची चळवळ केवळ बचतीपुरती मर्यादित न राहता, आता परिवर्तनाचे प्रभावी साधन बनली आहे. जिल्ह्यात सध्या ३० हजार ११२ बचत गट सक्रिय असून, त्यांच्याशी ३ लाख १५ हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. या गटांना बँकांशी जोडून १६८ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असताना, प्रत्यक्षात तब्बल ३५३ कोटी ०९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप करण्यात आले आहे. या भक्कम आर्थिक पाठबळामुळे महिलांनी आत्मनिर्भरतेची नवी पहाट अनुभवत ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला स्वयं सहाय्यता बचत गटांनी सक्षमीकरणाची ही दमदार भरारी घेतली आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लखपती दीदी’ उपक्रमातही जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी १ लाख ८० हजार ४४४ महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी १ लाख ३७हजार २३४ महिलांनी हा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे.
महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ग्रामसंघांच्या माध्यमातून सामूहिक खरेदी-विक्री तसेच कृषी सेवा केंद्रांची उभारणी करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली जात आहे. दर्जेदार उत्पादन, स्थानिक चव आणि आकर्षक पॅकेजिंगच्या जोरावर महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळत आहे. यासाठी जिल्हास्तरावर प्रदर्शने आणि मेळावे आयोजित केले जात असून, डिजिटल तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर केला जात आहे.
Asha Bhosle Funeral: आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
उमेद अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘उमेद मार्ट’ या ई-व्यापार प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील सुमारे १८० उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. समाजमाध्यमांच्या माध्यमातून ही उत्पादने राज्याबाहेरील तसेच देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचत असून, विक्रीत लक्षणीय वाढ होत आहे.
या आर्थिक प्रगतीमुळे पूर्वी कुटुंबात दुय्यम स्थान असलेल्या महिला आज निर्णयक्षम आणि नेतृत्वक्षम नागरिक म्हणून पुढे येत आहेत. उत्पन्नात वाढ झाल्याने मुलांच्या शिक्षणाला चालना मिळाली असून, कुटुंबाचे आरोग्य आणि जीवनमानही सुधारले आहे, ‘स्वतः सक्षम व्हा आणि समाजालाही सक्षम करा’ हा संदेश देत महिला बचत गटांनी निर्माण केलेला हा आदर्श जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावत आहे.
या प्रक्रियेतून स्थानिक पातळीवर अनेक यशस्वी उद्योजिका पुढे आल्या आहेत. अहिल्यानगर तालुक्यातील मीरा बेरड (स्वामी समर्थ गट), संगमनेरच्या शोभना सोनावणे (माई गट) आणि ज्योती संस्कर (मी उद्योजिका), पारनेरच्या शिल्पा बेलोटे (राधिका गट), श्रीगोंद्याच्या शीतल गवते, नगरच्या विनया मुळे (श्रीकृष्ण गट) व अश्विनी कोळपकर, श्रीरामपूरच्या ज्योती जगताप व साक्षी आघाडे (साई समृद्धी) तसेच अकोले येथील शीला इदे (संधान गट) यांनी आपली उत्पादने ‘ब्रँड’ म्हणून विकसित करत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.






