सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्याची क्रीडा क्षेत्रात लक्षवेधी ठरणारी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची निवडणूक यंदा खास होणार आहे. कारण, या निवडणुकीत दोन दिग्गज नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ थेट आमनेसामने येणार आहेत. शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली आहे. शनिवारी उशीर पर्यंत दोघांनीही माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी थेट लढत निश्चित झाली आहे.
अजित पवार हे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सलग तीन कार्यकाळ अध्यक्ष राहिले असून, यावेळी ते चौथ्यांदा या पदासाठी उमेदवारी करत आहेत. दुसरीकडे, मुरलीधर मोहोळ हे राज्यातील क्रीडा क्षेत्राशी निगडित नाव म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी या निवडणुकीतून आपला प्रभाव आजमावण्याची तयारी दाखवली आहे.
या निवडणुकीत तीन क्रीडा संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी अशा एकूण ६० मतदारांना मतदानाचा अधिकार असणार आहे. दोन नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि निकालानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या नेतृत्वावर कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आदिल सुमारीवाला, दयानंद कुमार, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले जाणार आहेत. तर सरचिटणीसपदासाठी नामदेव शिरगावकर आणि संजय शेट्ये यांच्यात लढत होईल. राज्याच्या क्रीडा विश्वासह राजकीय वर्तुळाचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले असून, 2 नोव्हेंबर रोजी कोण बाजी मारणार याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
कबड्डी संघटनेतून अजित पवार तर कुस्ती महासंघाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ रिंगणात उतरल्याने ही निवडणूक केवळ क्रीडा संघटनेपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनली आहे. ही लढत “राजकारण विरुद्ध खेळाडूपणा” की “अनुभव विरुद्ध नवी ऊर्जा” यामधली ठरणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.