संग्रहित फोटो
पुणे : मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले होते. सरकारने पाचव्या दिवशी त्यावर एक तोडगा काढला. त्यांच्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्यावर सरकारने सहमती दर्शवली. याविषयीचा एक शासन निर्णय घेण्यात आला. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांचे कमी उमेदवार निवडून आले, ते आपल्याला संधी मिळाली पाहिजे म्हणून लक्षच देऊन असतात. मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत विरोधकांनी आपल्याला राजकीय फायदा होईल का याचाही प्रयत्न केला. पण आता उत्तर मिळाल्यानंतर सगळे गपगार झाले आहेत,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. सगळेजण माध्यमांसमोर म्हणणे मांडत होते, आता त्यांना उत्तर मिळाल्याचे सांगत पवार म्हणाले, ‘‘समोरची लोकं लक्ष देऊन बसलेलीच असतात. कमी निवडून आलो आहोत, संधी शोधतात. आरक्षणाबाबतच्या सरकारच्या निर्णयामुळे काय होईल याची उगाचच चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही शंका न घेता सर्व सुरळीत होईल.’’
पवार पुढे म्हणाले, ‘‘लोकांनी प्रचंड संख्येने आम्हाला निवडून दिले आहे. आमच्यासोबत प्रचंड बहुमत आहे. लोकांचा सहभाग, विश्वास आणि त्यांचा सर्वांगिण विकास हाच आमचा विकासाचा मार्ग आहे. जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा फायदा द्यावा लागणार आहे. त्याचा फायदा जनतेला झाला पाहिजे ही पावलोपावली आमच्या सगळ्यांची भावना असते. वेळोवेळी वेगवेगळे प्रसंग उद्भवतात. परंतु शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल, याचा विचार केला जातो. काहीजण टपूनच बसलेली असतात. आपण इतके कमी निवडून आलो आहोत, आपल्याला काहीतरी संधी मिळाली पाहिजे. मुंबईत चार पाच दिवसांपूर्वी जे घडले, त्याचा काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला राजकीय फायदा होतो का, याचा प्रयत्न त्यांनी केला. टीव्हीसमोर जाऊन वेगवेगळी मते मांडली. आता त्यांच्या मताला उत्तर मिळाल्याने सगळे सध्या गपगार पडले आहेत.’’
ओबीसी समाज आक्रमक
मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी हा मेळावा होणार असून, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ॲड मंगेश ससाणे, मृणाल ढोले हेही उपस्थित राहणार असून, या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.