संग्रहित फोटो
बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलचा अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण?, याची उत्सुकता लागलेल्या सभासदांसह संपूर्ण राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचा चेअरमन मी स्वतः होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केले. माळेगाव कारखान्याचं भलं करायचं असेल, तर अजित पवारच करू शकतो असं सांगतानाच लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिम्मत ठेवणाऱ्यांच्या हातातच कारखान्याची सत्ता द्या, असे आवाहन करत माळेगाव कारखाना पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पाहुणेवाडी येथून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बारामतीचा आमदार म्हणून मी राज्यात फिरत असतो. माळेगाव कारखान्यात मीच चेअरमन झालो तर कारखान्याचं कोणतं काम अडेल का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री पवार यांनी मीच माझ्यासोबत ४० आमदार निवडून आणले आहेत. त्यातल्याच एकाला सहकार मंत्री बनवलं आहे. त्यामुळं आपली कामे कुठेही खोळंबणार नाहीत. त्याचवेळी मी स्वतः चेअरमन असल्यानंतर कारखान्यालाही शिस्त आल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान अजित पवार यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार आपण स्वतः असल्याचे जाहीर केल्यानंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट करून, त्यांच्या घोषणेचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना समर्थन दिले. माळेगाव कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवावी, गटातटाचा विचार कोणी करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.