नाफेड खरेदी केंद्राच्या 'कठीण अटीं'मुळे शेतकरी संतप्त (Photo Credi t- X)
सोयाबीन परत आणण्याची वेळ
हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी नियमानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून नंबर लागलेल्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केंद्रावर नेला होता. परंतु, वाडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी प्रक्रियेच्या तपासणीत (Grade Testing) बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन ‘मानकांमध्ये बसत नाही’ असे कारण देत परत पाठवण्यात आले. परिणामी, अनेक शेतकऱ्यांवर नाफेड खरेदी केंद्रावर नेलेले सोयाबीन परत आणण्याची वेळ ओढवली आहे.
ग्रेडरकडे परिपत्रकाची मागणी
या प्रक्रियेमुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन ग्रेडरकडे या कठीण अटींबाबत शासकीय परिपत्रकाची मागणी लावून धरली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास संबंधित अधिकारी उपस्थित झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे.
आ. देशमुख यांच्याकडे अपेक्षा
नाफेड खरेदी केंद्रावर लावण्यात येत असलेल्या या कठीण अटींबाबत मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करतील का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. वाडेगाव बस स्थानक परिसरात झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात स्थानिक शेतकरी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






