मोबाइल नेटवर्क कोलमडल्याने नागरिकांचे ऑनलाइन व्यवहार खोळंबले! (Photo Credit - X)
डिजिटल व्यवहार आणि अत्यावश्यक सेवा प्रभावित
सध्या कामकाजाच्या सर्व क्षेत्रांत डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सेवा, फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) यांचा वापर केला जातो. मात्र, नेटवर्क नसल्याने या व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. पेमेंट ॲप्स व्यवस्थित न चालल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर गंभीर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात रोख रकमेची (Cash) कमतरता असल्याने लोकांचे व्यवहार रखडले आहेत. ई-नाम (e-Nam), ई-पीक नोंदणी, खातेदारांचे बँक व्यवहार, पीएम-किसान अपडेट, खाते पडताळणी यांसारख्या शेतकऱ्यांसाठीच्या अत्यावश्यक सेवाही बंद पडल्या आहेत.
हे देखील वाचा: Akola News : मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान! सुरक्षा सेवेत उत्कृष्ट कामगिरी
विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही मोठा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना गुगल क्लासरूम (Google Classroom), व्हिडीओ लेक्चर्स, होमवर्क अपलोड आणि ऑनलाइन चाचण्यांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. सध्या अनेक महत्त्वाच्या परीक्षा, शिष्यवृत्ती फॉर्म (Scholarship Forms) आणि प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
“गेल्या महिनाभरापासून चान्नी गावांत एअरटेलची सेवा अत्यंत वाईट झाली आहे. कॉल ड्रॉप होणे, नेटवर्क नसणे आणि इंटरनेट काम न करणे या समस्या नित्याच्या झाल्या आहेत. ग्राहकांकडून शुल्क घेऊनही अशी निकृष्ट सेवा देणाऱ्या एअरटेलच्या संबंधितांनी तत्काळ दखल घ्यावी.” – अक्षय बोदडे, सेतू केंद्र चालक, चान्नी
मनमानीवर नियंत्रण कोण ठेवणार?
गेल्या दशकात सरकारने माहिती तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार, शिक्षण, परीक्षांचे फॉर्म भरणे अशी असंख्य कामे ऑनलाइन केली आहेत.
“मात्र, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या मनमानीवर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही. या आठवड्यात तर गैरसोयीने कळस गाठला आहे. ग्राहकांना होणाऱ्या मनस्तापास जबाबदार कोण?” – गजानन गाडगे, चान्नी
मागील काही महिन्यांपासून नेटवर्कची समस्या अधूनमधून डोके वर काढत होती. नेटवर्क कंपन्यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी चान्नी येथील नागरिकांकडून होत आहे.






