साताऱ्यामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावत असल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले (फोटो - सोशल मीडिया)
ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनात अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये कोणतेही नवीन तांत्रिक उपकरण बसवताना ग्राहकाची परवानगी आवश्यक असते, मात्र सातारा जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून मीटर बसवले जात आहेत. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत, त्यामुळे या मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वीज कपात आणि आर्थिक नुकसान: स्मार्ट मीटरमुळे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन बंद केले जात आहे. यामुळे ग्राहकांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हे देखील वाचा : अविश्वास ठरावावर लोकसभेत जोरदार चर्चा; राहुल गांधींनी केले ‘हे’ गंभीर आरोप
स्मार्ट मीटरद्वारे घरातील वीज वापराचा डेटा सतत कंपनीकडे जात असल्याने ग्राहकांच्या खासगी माहितीच्या (Privacy) सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यामध्ये नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर हे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले असतानाही, प्रशासनाकडून त्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल सदर पत्रात विचारण्यात आला आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
स्मार्ट मीटरच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही. जर सातारा जिल्ह्यात प्रशासनाने ही सक्ती थांबवली नाही, तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष श्री. राहुल शिवनामे यांनी दिला आहे.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष श्री राहुल अनिल शिवनामे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत कार्यकारणी सदस्य श्री जयदीप ठुसे श्री प्रवीण शहाणे, श्री संजय यादव, श्री विक्रम बोराटे, श्री गौरव कासट श्री रमाकांत शालगर आणि पदाधिकारी उपस्थित होते.या निवेदनामुळे आता जिल्हा प्रशासन आणि वीज वितरण कंपनी काय भूमिका घेते, याकडे सर्व सातारकरांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : ”नाल्यातून गॅस निर्मिती अन् पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग…! गॅस तुटवड्यावरुन खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र






