संग्रहित फोटो
पंढरपूर/नवनाथ खिलारे : नगरपरिषद निवडणुकीचा माहोल आता पंढरपूरातही जोरदार तापला आहे. २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्जही भरणे सुरू होणार आहेत. सोमवारपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाच प्रारंभ होत असताना पंढरपूरात इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपले देव पाण्यात ठेवलेत. काँग्रेससह भाजपा, उद्धव ठाकरे शिवसेना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना यासह दोन्ही राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी नेत्यांच्या दरबारी गर्दी केली आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या १८ प्रभागातील ३६ जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेससह भाजपा, उद्धव ठाकरे शिवसेना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा सर्व पक्षांनी नगरपरिषद निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रामुख्याने सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेल्या काही जणांच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांनी आता नेत्यांकडे आम्ही संकटाच्या काळात पक्षासोबत होतो असे म्हणत उमेदवारीवर दावा ठोकला आहे. सध्या प्रत्येकालाच उमेदवारी हवी आहे. त्यामुळे सारेच जण आपल्या पक्षनेतृत्वाकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून आहेत.
कोणत्या पक्षाकडून कोण इच्छूक ?
पंढरपूर नगरपरिषदेसाठी विठ्ठल परिवाराकडून प्रणिती भालके, साधनाताई भोसले उमेदवारीसाठी इच्छूक आहे. तसेच पांडूरंग परिवाराकडू स्मिता अधटराव, वैशाली वाळूजकर, या इच्छूक आहेत. १० नोव्हेंबरपासून उमेदवाराच्या हालचाली वाढणार आहेत.
समाधान आवताडेंचा परफॉर्मन्स नगण्य
भाजपाचे स्थानिक आमदार समाधान आवताडे यांचा परफॉर्मन्स पंढरपूर नगरपरिषदेत सध्या तरी काही दिसत नाही. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल, यासह कुठल्या प्रभागातून कोण लढणार, याचीही चर्चा नाही. सध्या निवडणूक विभागाने आचारसंहिता लागू केली. प्रशासनही या निवडणुकीबाबत एकदम अॅक्टिव्ह दिसत नाही, हे विशेष.
स्वबळ की आघाडी-महायुती?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये साधारणतः स्वबळावरच अनेक पक्ष निवडणुका लढतात. सध्या पंढरपूरात काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वातील भाजपाही मैदानात उतरली आहे. भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वातही पक्षाची मोठी ताकद आहे. एकंदरीत अनेक दशकांपासून नगरपरिषदेची सत्ता त्यांच्या ताब्यात राहिली. काहींनी पक्षासोबत गद्दारी केली तरी आम्ही निष्ठावंत म्हणून सोबत असल्याचे सांगत उमेदवारी मागितली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षात भाऊगर्दी असल्याने महाविकास आघाडी व महायुतीतील पक्ष स्वबळावर लढणार की युती, आघाडीकडून हे लवकरच समजणार आहे.
शहर विकासाचा प्रश्न गंभीर
पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून खरे तर शहराचा फारसा विकास झाला नाही. मात्र, तरीही चाणक्यनीती वापरून या निवडणुकीत कोणता गट अव्वल ठरेल हे दिसणार आहे. मागील पाच वर्ष नगराध्यक्षांचा कार्यकाळ प्रभावी नव्हता. त्यामुळे आता किमान सर्व पक्षांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार अभ्यासू द्यावा, अशी मागणी होत आहे.






