Beed Audio Clip news
बीड : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला जवळपास २० दिवस उलटून गेल्यानंतर एक धक्कादायक ऑडियो क्लीप समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत आपण भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना धोका दिला, अशा प्रकारचा संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपही बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि शरद पवार यांच्या गटाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप असल्याचे सांगितले जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली दिली आहे. इतकेच नव्हे तर, या ऑडिओ क्लिपमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचाही संवाद आहे. त्यानंतर कुंडलिक खांडेंविरोधात परळीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आपण शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना कशाप्रकारे मदत केली असा संवाद आहे. यात ते निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना कशी मदत करायची हे ते सांगत आहेत. तर, मतमोजणीनंतर व्हायरल झालेली दुसरी ऑडिओ क्लिप आहे. कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून म्हणजे म्हाळस जवळा या ठिकाणी आपण पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. तर ओबीसी मतांचा फायदा होऊ शकतो या उद्देशाने आपण बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथवर बजरंग सोनवणे यांच्यासाठी कशा पद्धतीने जुळवाजुळव केली, हे ते सांगताना ऐकू येत आहे.
दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी खांडे यांच्या ऑफिसची तोडफोडही केल्याची माहिती समोर आली आहे. जालना रोडवरील खांडेंच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. भाजपाच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या फेरीपर्यंत या सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यात निर्णायक लढत झाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे बजरंग सोनावणे विजयी झाले. सुरुवातीला पंकजा मुंडेचा हा पराभव मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टरमुळे झाल्याची चर्चा होती. त्यातच महायुतीतील मतभेदांचाही फटका बसल्याचे सांगितले जाते.