मुंबई – ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वतः माईक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे, पण आताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माईक खेचायला लागले आहेत. पुढे काय काय खेचतील सांगता येत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ‘पीए’ म्हणून ठेवले, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लगावला आहे.
अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द उर्फ़ रतनपूर या गावाला रस्ता नाही. गेल्या चार दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटला आहे. येथे रोगराई वाढली आहे. या गावात आरोग्य विभागाचं पथक औषधं घेवून दाखल झालं आहे. या सोबतच गावातच ‘एसडीआरएफ’ची एक तुकडी तयार ठेवली आहे. यासोबतच गावाशेजारच्या पानखास नदीवरील नदीवरच्या पुलाची उंची कमी असल्याने गावकर्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. पाऊस आणि पुर परिस्थितीत गावकर्यांना अक्षरश: चिखल तुडवावा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गावात भेट दिली. शेतातून चिखल तुडवत ते गुडघाभर पाण्यातून गेले. गावकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले.
19 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्यानंतर हे सरकारच टिकणार नाही.जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. जिल्ह्याला पालकमंत्री नाही. राज्याला कृषिमंत्री नाही, मग हे सरकार काय झोपा काढण्यासाठी आले आहे का. या सरकारला थोडीसी लाज लज्जा शरम असेल तर गावात येवून बघावं. अजूनही या राज्याला कृषीमंत्री नसेल तर या सरकारचा आम्ही धिक्कार करतो.