आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई
न्यायालयीन आदेशानुसार नायलॉन मांजाचा साठा किंवा वापर करताना आढळून आल्यास संबंधितास सहा महिने तुरुंगवास व दहा हजार रुपयांचा दंड, तर उत्पादन, विक्री किंवा विक्रीसाठी वाहतूक करताना आढळल्यास तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास व अंदाजे एक लाख रुपयांचा दंड ठोठावणार आहे. शिवाय अमरावती ग्रामीण पोलिस दलाने नायलॉन मांजाच्या विक्री किंवा साठवणुकीसाठी तब्बल अडीच लाख रुपयांचा दंड आणि वापरासाठी ५० हजारांचा दंड प्रस्तावित केला आहे. तरीही प्रत्यक्षात बंदी घातलेला मांजा खुलेआम विकला जातो आहे. या पाश्र्श्वभूमीवर मात्र अमरावती ग्रामीण पोलिसांनी ठोस पावले उचलत कारवाईचा इशारा दिला आहे.
नायलॉन मांजासंबंधीचे गुन्हे हे सत्र न्यायालयात चालविले जातात. त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण भागात नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठवणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे आदेश दिलेत. शहरात मात्र मनपा व पोलिस प्रशासनाकडून पतंग व मांजा विक्री प्रतिष्ठानांची तपासणी सुरू आहे. यात पोलिस विभागाकडून काही प्रमाणात कारवाया करण्यात आल्यात. परंतु, मनपाकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
गुरुवारी (दि. ८) लोणी पोलिस ठाणे हद्दीत मनोहर गोविंदराव ढेंबरे (रा. लोणी) याला पतंग उडविताना रंगेहाथ पकडले. नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव असूनही नायलॉन मांजाचा वापर केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी वरूड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बंगला चौक परिसरात छापा टाकून शे. कदीर शे. बशीर (रा. वरूड) याच्या दुकानातून विक्रीसाठी साठवलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला, एकूण ५१ रिल्स असा २३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला.






