अकलूज : माढा मतदार संघातून लोकसभेची निवडणुक लढविण्यासाठी मी इच्छुक होतो. परंतु शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर आमच्यात काही विषयांवरून पारदर्शक चर्चा झाली नव्हती. त्यामुळे मी गत दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता. नंतर शरद पवार व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशी माझी बैठक झाली. ज्या विषयांवर अडचणी होत्या, त्या अडचणी सुटल्या. त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरण्याचा विचार सोडून धैर्यशील मोहिते-पाटील यांना सहकार्य करण्याचे ठरवले असल्याचे सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले.
गत दोन दिवसांपासून नाराज असलेले डॉ. अनिकेत देशमुख माढा लोकसभेसाठी अपक्ष अर्ज भरणार असल्याच्या चर्चाना उत आला होता. डॉ. देशमुख यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. परंतु डॉ. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी अपक्ष अर्ज भरण्याचा विचार रद्द करून धैर्यशील मोहिते-पाटील यांना साथ देण्याचे ठरवले. त्यादृष्टीने प्रचाराचे नियोजन बैठकीसाठी ते अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले.
अपक्ष अर्ज भरण्याबद्दल डॉ. देशमुख म्हणाले, सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या काही सूचना व अडचणी होत्या. सांगोला तालुक्यातील काही योजनांबद्दल आम्हाला क्लिअर मेसज मिळत नव्हता म्हणून मी अपक्ष अर्ज भरण्याचे ठरवले होते. परंतु पवार साहेबांनी व धैर्यशील मोहिते-पाटील यांनी त्याबद्दल मला विश्वासात घेतले आहे. येथुन पुढचे राजकारण सहकार्याचे राहिल, याबद्दल शब्द दिला असल्याने मी अपक्ष अर्ज भरण्याचे रद्द केले आहे. कै. गणपतराव देशमुख महाविकास आघाडीबरोबर होते. शरद पवार यांच्याबरोबर होते. त्यांच्या नंतर आम्हीही महाविकास आघाडीशी एकरूप राहु. आबांनी जशी शरद पवार यांना साथ दिली, तशीच साथ आम्हीही येथून पुढे देणार आहोत.
सांगोला तालुक्यातून मताधिक्य देणार
माझी वैयक्तिक कोणतीही नाराजी नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एकत्र बसून बोलणे गरजे होते. आता सर्व विषय संपले आहेत. आम्ही धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी जोमाने तयारी करत आहोत. धैर्यशील मोहिते-पाटील यांना सांगोला तालुक्यातून मताधिक्य देण्यात मी व माझे कार्यकर्ते कोठेही कमी पडणार नसल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
निंबाळकरांची अवस्था ‘कभी खुशी, कभी गम’
डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नाराजीमुळे दोन दिवसांपासून माढा मतदार संघात थोडीशी खळबळ उडाली होती. भाजपाच्या गटामध्ये यामुळे जोश निर्माण झाला होता. डॉ. देशमुखांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मतांची विभागणी होणार अशी चर्चा जोर पकडत असतानाच डॉ. देशमुखांचे बंड शमले. त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची अवस्था ‘कभी खुशी, कभी गम’ अशी झाली आहे.