सौजन्य - नवराष्ट्र टीम
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येत आहे. तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळतं नाही तो पर्यंत इथंच राहणार असल्याचे म्हटले आहे.
दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचे अनेक कारनामे पाठीशी घातल्याचं म्हटलं होतं. त्याच प्रवृत्ती वाल्मिक करांडासारख्या व्यक्तींना मोठं करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार असल्याचा एल्गार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी आज बीडमध्ये निघत असलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडायला भाग पाडत नाही तोपर्यंत ठिय्या देत राहू असेही त्यांनी म्हटलं आहे.
3 आरोपींची हत्या
दरम्यान, दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पोलिसांनी पकडले नसलेल्या तीन आरोपींबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केला आहे. याबाबत मला फोन आल्याचा दावा त्यांनी केला.
हे सुद्धा वाचा : पुण्यात पोलीस अधिकार्याला लाच देण्याचा प्रयत्न; एसीबीने एकाला रंगेहात पकडले
बीडमधील प्रकरणावरुन वातावरण तापलं
राज्यामध्ये बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेला 20 दिवस उलटून गेले तरी प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचे नाव मास्टरमाईंड म्हणून समोर आले आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच वाल्मिक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत निकटचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे प्रकरण तापलेले आहे.