अलिबाग: आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्या नावाचे फेक पत्र साेशल मीडियावर प्रसारीत करणार्या शुभम काळे याची पाेलीस काेठडीची मुदत आज संपली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. काळे याला स्थानिक पातळीवरील जामिनदार न मिळाल्याने त्यांची आजची रात्र कोठडीत जाणार आहे,अशी माहिती रायगडच्या (Raigad Crime) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांनी नवराष्ट्रशी बाेलताना दिली.(Crime News)
शनिवारी, 22 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक खोटे पत्र साेशल मीडियावर प्रसारीत झाले. या पत्रात यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले होते. समाजमाध्यमांवर हे पत्र माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत हाेते. असे काेणतेच पत्र प्रसिध्द केले नसल्याचे धर्माधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले हाेते. तसेच पाेलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितले हाेते.
त्यानुसार नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तपास सुरु केल्यानंतर साेमवारी पुणे येथून शुभम काळे या तरुणाला अटक करण्यात आली हाेती. त्याला अलिबाग न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली हाेती. आज पाेलीस काेठडीची मुदत संपल्याने शुभमला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पुन्हा पाेलीस काेठडी न सुनावता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयीन काेठडीत आराेपीची रवानगी झाल्यावर ताे तातडीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज करु शकताे. मात्र शुभमला स्थानिक जामिनदार न मिळाल्याने त्याला आजची रात्र अलिबागच्या कारागृहात काढावी लागणार आहे.