Mahadevi Elephant : नांदणीतील ७ हजार नागरिकांनी केले जिओचे सिम कार्ड बंद
कोल्हापूर / दीपक घाटगे : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात वास्तव्य करणारी महादेवी ही हत्तीण पंचकल्याण पूजा, मिरवणुका, धार्मिक सोहळ्यांची आकर्षण ठरली होती. तिचा शांत, शिस्तबद्ध स्वभाव गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या मनात खोलवर घर करून राहिला होता. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही अनेक गावागावातून महादेवीबाबत लोकांच्या भावना गुंतल्या आहेत. याच प्रकरणाचा फटका रिलायन्स कंपनीला बसला आहे. नांदणीतील ७ हजार नागरिकांनी जिओचे सिम कार्ड बंद केले.
गेली ३३ वर्षं गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या ‘माधुरी’ ऊर्फ महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात जाव लागले. पण नांदणी गावच्या काळजाचा तुकडा हरपल्यासारखं सगळ्यांना वाटत आहे. मठाच्या अखत्यारितील गावांमध्ये होणार्या ‘पंचकल्याणक प्रतिष्ठा’ महोत्सवात या हत्तीणीला विशेष मानाचे स्थान आहे. पंचकल्याणी पूजेतील इंद्र-इंद्राणींना हत्तीवरून मिरवणुकीने भगवंतांच्या अभिषेकस्थळी नेले जाते, जो परंपरेचा एक अविभाज्य भाग मानला जातो. नांदणी येथील जैन मठ हा महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील ७४८ गावांतील जैनधर्मीयांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे.
हेदेखील वाचा : महादेवीबरोबरच आणखी तीन मठाधीपतींना नोटीस; कारण नेमकं काय?
वन्य जीव (संरक्षण) कायदा, १९७२ लागू झाल्यापासून मठाने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हत्तीणीचे संगोपन केले होते. पण वनताराचे गेल्या तीन-चार वर्षांपासून ‘महादेवी’ हत्तीणीला मठातून घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू होते. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाचा निर्णय मठाच्या विरोधात गेला. पण सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र, या ठिकाणीही अर्ज फेटाळण्यात आला.
…अशी झाली या प्रकरणाची सुरुवात
या प्रकरणाची सुरुवात ‘पेटा’ या प्राणी हक्कांसाठी लढणार्या संस्थेच्या आरोपानंतर झाली. त्यांनी मठावर वन विभागाची परवानगी न घेता ‘महादेवी’ हत्तीणीला तेलंगणातील एका मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीने जून आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये हत्तीणीची तपासणी करून अहवाल सादर केला होता, ज्याच्याआधारे न्यायालयाने हा निर्णय दिला. मात्र, अलीकडे अंबानींच्या वनतारा ट्रस्टने महादेवीवर दावा ठोकत ती त्यांच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केली होती.
न्यायालयीन लढाई सुरु झाली अन्…
या दाव्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन लढाई सुरु झाली आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै २०२५ रोजी महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश कायम ठेवले. गावकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. महादेवीच्या विरहाने व्यथित झालेल्या गावाने अनोखा मार्ग स्वीकारला आहे. गावात सध्या संतापाची लाट उसळली आहे.
जिओतून पोर्ट आउट सुरु
नांदणी गावातील तब्बल ७ हजार नागरिकांनी आपले जिओ सिम कार्ड बंद करून एअरटेलसह इतर कंपन्यांकडे पोर्टिंग सुरु केलं. या निषेधाला मठाशी संबंधित असलेल्या सुमारे ७४३ गावांमधूनही जोरदार पाठिंबा मिळत असून, अनेक ठिकाणी ग्रामसभांमध्ये ठराव काढून ‘माधुरीला परत आणा’ अशी मागणी सह्यांच्या मोहिमेद्वारे केली जात आहे.