Chhatrapati Sambhajinagar Water Crisis (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नव्याने कार्यान्वित केलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (महावितरण) विजेचा जोरदार फटका बसला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे, ज्यामुळे शहरात पुन्हा एकदा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराला दररोज मिळणाऱ्या १७१ एमएलडी (MLD) पाण्याऐवजी आता केवळ १४५ एमएलडी पाणी मिळत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा परिणाम थेट पाणीपुरवठा योजनांवर झाला आहे. दिवाळीपूर्वी आणि ऐन दिवाळीत वीज बिघाडामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. दिवाळी संपताच पुन्हा वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला.
पाच दिवसाआड मिळणारे पाणी आता पुन्हा आठ दिवसांवर गेले आहे. अनेक भागांत एक दिवस उशिराने पाणी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी फारोळा वीज उपकेंद्रात मोठा बिघाड झाला. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या २६ दललि, ५६ दललि आणि १०० दललि क्षमतेच्या तिन्ही योजना एकाच वेळी बंद पडल्या, ज्यामुळे शहरवासीयांना निर्जळीचा (पाणी नसण्याचा) सामना करावा लागला. ५६ आणि १०० दललि क्षमतेच्या योजना सुरू झाल्या, मात्र २६ दललि क्षमतेची योजना दुरुस्तीअभावी बंद राहिली. वीज उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी साहित्य मिळत नसल्याने दुरुस्तीचे काम करता आले नाही. या २६ एमएलडी योजनेतून मिळणारे सुमारे ३१ एमएलडी पाणी बंद झाल्याने शहरात पाण्याचा मोठा तुटवडा जाणवला.
तब्बल ५० तासांनंतर (मंगळवारी सायंकाळी ६ वाजता) २६ एमएलडीचा एक पंप सुरू करण्यात आला आणि रात्री ८ वाजता शहरात पाणी आले. हा पाणीपुरवठा सुरू झाल्याने पाण्याचा गॅप कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्यातील अडथळ्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.






