नाशिकच्या तयारीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या तीर्थक्षेत्रांकडे पर्यटकांचा ओघ! (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ८७१९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यावर अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची पाऊले वेरुळ-घृष्णेश्वर आणि पैठणसारख्या तीर्थक्षेत्रांकडेही वळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असले तरी, कामांना सुरुवात न झाल्यामुळे घाईघाईत निकृष्ट कामे होऊन कोट्यवधींचा निधी पाण्यात जाण्याचा सूर आवळला जात आहे.
नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनाची बैठक होऊन जवळपास महिना उलटला आहे. या बैठकीत मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सीईओ अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली होती. २०२७ च्या कुंभमेळ्यात अंदाजे एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यानंतर मराठवाड्यातील तीर्थस्थळे (वेरुळ, पैठण) आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी लाखो भाविक, पर्यटक येतील. परिवहन व वाहतूक व्यवस्था, मुलभूत सुविधा, निवास व्यवस्था, सुरक्षा आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन या मुख्य बाबी विचारात घेऊन कृती आराखडा तयार केला गेला आहे. असे असूनही, अजूनही या नियोजित कामांचा ‘श्रीगणेशा’ न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कुंभमेळ्यामुळे पर्यटक प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी येथील विमानतळांवर उतरून नाशिककडे जातील. या काळात या भागातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढेल. अजिंठा, वेरुळ, पितळखोरा लेणी, घटोत्कच लेणी, दौलताबाद किल्ला, बिबी का मकबरा, नहर ए अंबरी, पाणचक्की, जायकवाडी धरण, गौताळा अभयारण्य. सिंहस्थ पर्वात दररोज ३ लाख पर्यटकांची हजेरी अपेक्षित आहे.
वाहतूक व्यवस्था
१३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग आणि निवास व्यवस्था (धुळे सोलापूर महामार्ग, खुलताबाद रस्ता लगत). धार्मिक स्थळांजवळ ई-रिक्षा सेवा. रियल टाईम डिस्प्ले आणि जीपीएस अनुकूल पथदिवे.
मूलभूत सुविधा
स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छता गृहे, शुद्ध पाण्याची व्यवस्था (RO प्लांट, टँकर), प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि माहिती केंद्रे. तीन लाख लोक राहू शकतील अशा क्षमतेची तंबू शिबिरे व धर्मशाळा दुरुस्ती.
निवास व भोजन
हॉटेल्स व लॉजेससाठी QR कोड बुकिंग सेवा. तीर्थक्षेत्रांजवळ अन्नक्षेत्रे उभारणे.
सुरक्षा व्यवस्था
सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे देखरेख, तात्पुरत्या पोलीस चौक्या व नियंत्रण कक्ष. आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन केंद्रे सज्ज. महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन व महिला पोलीस पथके.
तंत्रज्ञान/माहिती
दर्शनाचे वेळापत्रक रियल टाईम उपलब्ध करणे. मोफत वायफाय सुविधा. पर्यटकांसाठी माहितीचे ॲप व पोर्टल्स, QR कोड व व्हर्च्युअल गाईड सुविधा.
स्वच्छता
निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे नियोजन.
बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती निवासस्थाने, संदेशवहन उपकरणे आणि वाहनांची व्यवस्था ग्रामीण पोलिसांकडून केली जात आहे. सौर ऊर्जेचा वापर, रस्ते सुरक्षा उपाययोजना आणि ज्येष्ठ/दिव्यांग भाविकांसाठी वाहन व्यवस्था या बाबींचाही या आराखड्यात समावेश आहे.






