मुंबई : ‘मला केवळ शिंदे गटाच्या 16 आमदारांबाबत नव्हे तर शिवसेनेच्या (Shivsena MLA) सर्व 54 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे’, असे महत्त्वाचे विधान करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतरच्या राजकारणाचे संकेत दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील, असे समजले जात होते. मात्र, एका कार्यक्रमात नार्वेकर यांनी या प्रकरणाची दिशा बदलणारे विधान केले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडल्याचे कोणतेही लेखी निवेदन माझ्यापुढे अद्याप सादर झालेले नाही. त्यामुळे केवळ 16 नव्हे तर शिवसेनेच्या सर्व 54 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर निर्णय घ्यायचा आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
लवकरच निर्णय घेणार
बहुमत नसल्याने सरकार पडलेच असते. राज्यपालांचा आदेश चुकीचा ठरवून न्यायालयाने रद्द केला. तरी बहुमत नसलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा त्यापदावर नियुक्ती करणे कसे योग्य ठरले असते? भरत गोगावले यांची नियुक्ती संसदीय पक्षाने केली होती. ती राजकीय पक्षाने केली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने ही नियुक्ती रद्द केली आहे.
आता प्रतोद म्हणून मान्यता देताना पक्ष, प्रमुख आणि अन्य बाबी तपासण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सध्या शिवसेनेचे प्रतोद कोण, नवीन प्रतोद नियुक्ती करण्यासाठी किती कालावधी लागेल. आदी बाबीविषयी शक्य तितक्या लवकर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.