बच्चू कडू यांनी विधानसभेपूर्वी गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. महायुतीसह महाविकास आघाडी उमेदवार आणि जागावाटप याची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी देखील तयारी झाली आहे. यामध्ये बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्या संघटना सामील झाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना देखील तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी विनंती केली जात आहे. दरम्यान, बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे देखील बोलले जाते. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधतात. यावेळी त्यांनी गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले. बच्चू कडू म्हणाले की, “महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही जनता कंटाळली आहे. दोन्ही युती-आघाडीत जागावाटपामध्ये तिढा आहे. भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ. चार तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल. 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल, महाशक्ती हा स्फोट करणार आहे,” असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : राष्ट्रवादीमध्ये चाललंय तरी काय? अजित पवारांच्या उमेदवाराला शरद पवारांचा पाठिंबा?
पुढे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडू म्हणाले की, “चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार आहेत. युती आणि आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे. जरांगे पाटील यांच्या संबंधात माझे काही बोलणे झाले नाही. उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार,” असे म्हणत बच्चू कडूंनी विधानसभेमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला.