पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण काँग्रेसचे नाराज बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण आता त्यांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला, याचे कारण समोर आले आहे.
कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात काँग्रेसमध्ये गेल्या 40 वर्षांपासून असलेल्या बाळासाहेब दाभेकर यांना डावलून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दाभेकर यांची मनधरणी सुरू होती. तरीदेखील ते अपक्ष लढण्यावर ठाम होते. बुधवारी रात्री त्यांना काँग्रसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा फोन होता. त्यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर अखेर दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
काँग्रेस नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न
बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केल्याचे समजल्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या सूचनेवरून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब दाभेकर यांच्याशी चर्चा केली. पुढच्या वेळी संधी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. त्यात राहुल गांधींचा फोन आल्याचेही स्पष्ट होत आहे.