Baramati Politics: दोन चिमुकल्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; बारामतीत नेमकं काय झालं?
रविवारी पहाटे (२४ मे )त्यांनी विद्या प्रतिष्ठान प्रांगणातील लोकनेते अजित पवार यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पगुच्छ अर्पण करत दादांच्या प्रतिमेला भावपूर्ण अभिवादन केले. यानंतर त्या सहयोग निवासस्थानी दाखल झाल्या. महिला वर्गाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून मोठ्या संख्येने महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी उपस्थित होत्या.
बारामती सह इतर भागातून आलेल्या नागरिकांनी सहयोग या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या लेखी व तोंडी स्वरूपात मांडल्या. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सर्व समस्या ऐकून तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना त्या सोडवण्यासंदर्भात सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेत होत्या. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकांनी खास पंढरपूरहून वहिनींसाठी अनोखी भेट आणत आपला स्नेह व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांनीही अत्यंत आपुलकीने त्यांच्याकडून भेट स्वीकारली व त्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनीही सुनेत्रा पवार यांच्या संवेदनशील व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले.
सुनेत्रा पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेत होत्या. यावेळी दोन चिमुकले आपल्या वडिलांसोबत सहयोग निवासस्थानी आले आणि हरवलेल्या आपल्या आईला शोधून देण्याची आर्त विनंती त्यांनी वहिनींसमोर केली. चिमुकल्यांचे दुःख ऐकून सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्यांनी आपुलकीने मुलांची विचारपूस करत संबंधित यंत्रणांना तत्काळ त्यांच्या आईचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच कुटुंबाला धीर देत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.






