लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार; फ्लॅटसाठी पैसेही घेतले अन् नंतर जिवे मारण्याची धमकी दिली (फोटो सौजन्य: iStock)
बीड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता बीडमध्ये एका शिक्षिकेवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाहीतर फ्लॅटसाठी तिच्याकडून पैसेही घेण्यात आले.
याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केले. पोलिसांनी या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण बलभीम शिंदे याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहशिक्षिका असलेल्या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. फ्लॅटसह इतर कामासाठी पैसे घेऊन विश्वासघात करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नारायण शिंदेविरूध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले की, एप्रिल २००६ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यात फ्लॅटसाठी व इतर कामासाठी पैसे घेऊन अन्यायाने विश्वासघात केला व जिवे मारण्याची धमकी दिली.
बीडच्या परळीतही अत्याचाराची घटना
बीड जिल्ह्यातील परळी येथे एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या रेल्वे स्थानकात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, विशेषतः फाशीची शिक्षा मिळावी,या मागणीसाठी परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.