सौजन्य - सोशल मिडीया
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या पार पडल्या. यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेमध्ये या सर्व आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. आज शपथविधीवेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंचं नाव का घेतलं?
“नाथांचे नाथ म्हणून आपण स्मरण करतोच. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मी आज सभागृहात पोहोचली आहे. अनेक समाजकार्य, राजकारण केल्यानंतर मी सभागृहात पुन्हा एकदा परतली आहे. दिल्लीतून मुंबईत येण्याची संधी प्रथमच मिळत आहे,” असं भावना गवळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
शिवसेना शिंदे गटाच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी या यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे त्याचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं. या ठिकाणीही महायुतीच्या उमेदवारला पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र विधानपरिषदेत भावना गवळींना उमेदवारी दिली होती. त्या आमदार म्हणून निवडून देखील आल्या आहेत, आज त्यांचा शपविधी पार पडला यावेळी त्यांनी संधी देणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांचे देखील नाव घेतले आहे.






