संग्रहित फोटो
भाजपने केवळ प्रभागातील महिला आरक्षणाच्या गटातच नाही तर सर्वसाधारण (पुरुष) प्रभागांमध्येही महिला उमेदवारांना संधी दिली आहे. सर्वसाधारण वार्डांमध्ये पुरुष उमेदवारांना उमेदवारी मिळणे अपेक्षित हाेते. परंतु अशा ९ ठिकाणी महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण योजना’ या संकल्पनेला थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवत, महिलांना नेतृत्वाची संधी देण्याकडे भाजपचा कल दिसत आहे.
महापालिका निवडणुकीत महिलांना सर्वाधिक संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. पुणे शहराला शिक्षण, आयटी, उद्योग आणि सामाजिक चळवळींचा मोठा वारसा लाभलेला आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे ही काळाची गरज असल्याने भाजपने हा निर्णय घेतल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे.
आरक्षण नसलेल्या जागांवर ज्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामध्ये निवेदिता एकबोटे, संगीता दांगट, अर्चना जगताप, विनया बहुलिकर, कविता वैरागे, वीणा घोष, पल्लवी जावळे, रेश्मा भोसले आणि रंजना टिळेकर यांचा समावेश आहे.
महिलांना उमेदवारी देण्यामागे असाही फंडा
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आयात उमेदवारांमुळे इच्छुकांची संख्या जास्त होती. तर, काही उमेदवारांबाबत पक्षांत नाराजी होती. अशा उमेदवारांना आमदारांसह प्रदेश पातळीवर झालेला विरोध पाहता खुल्या जागांवर पुरूषांऐवजी महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील पुरुष उमेदवारांपुढे महिला आल्या आहेत. महिलांना आरक्षित जागांपुरते न मर्यादित ठेवता खुल्या जागांवर उतरवण्याचा हा प्रयोग राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरेल, की भाजपसाठीच डोकेदुखी ठरेल, हे निकालानंतर स्पष्ट होईल.






