सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांचे दौरेदेखील वाढले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती नको असे आदेश कार्यकर्त्यांना दिले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या युतीमुळे कणकवलीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे या राणे बंधूंमध्ये थेट राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट युती होणार असल्याच्या चर्चेवरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
सिंधुदुर्गमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, अस झालं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही संबंध तोडू. विशाल परब आणि राजन तेली यांना मी मनात नाही. मी त्यांना नेहमी विरोध करीन. प्रतिष्ठित नागरिकात राजन तेली बसत नाही. सर्वांनी टाकून दिलेलं एकनाथ शिंदे का जमा करतोय? असा सवाल नारायण राणेंनी शिंदेंना विचारला. तर विशाल परब मला भेटू दे मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे देखील नारायण राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सतत भेटी होत आहेत. याबाबत राणे म्हणाले की, अनेक बातम्या येत आहेत. बंधूंच्या भेटी होत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या दौऱ्यात सरकारवर आरोप करत आहेत. आता ते बोलत आहेत. ते मुख्यमंत्री असताना काय केलं? सगळं अस्तित्व संपलं. अस्त्र पण संपत चाललंय. ते संपू नये. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव बोलतात. सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांची नाही. जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा मुंबई काय होती आणि आता काय होतेय ते बघावं, अस नारायण राणे म्हणाले.
युती उद्धव ठाकरेंना मान्य होणार का?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदेंसोबत कसलीही राजकीय तडजोड होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तळकोकणात होत असलेली ही अनोखी युती उद्धव ठाकरेंना मान्य होणार का आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला ते मान्यता देणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.






