शरद पवार यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत वक्तव्य केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होऊन महिने उलटले असले तरी देखील निकालावरुन अद्याप राजकारण सुरु आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विधान सध्या चर्चेमध्ये आहे. जयकुमार गोरे यांनी काहीही झालं तरी शरद पवारांसमोर झुकणार नाही असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री जयकुमार गोरे हे एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय वक्तव्य केली. ते म्हणाले की, “ज्या लोकांवर माझ्या माण खटावच्या मातीने, जिल्ह्याने प्रचंड प्रेम केलं अशा बारामतीच्या लोकांना सर्वात आधी कळ लागली की हा सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. हा साधा माणूस आमदार कसा होऊ शकतो. मी आमदार झालो हे त्यांनी १० वर्ष मान्य केलं नाही. आता आमदार झालो हे मान्य झालं, पण मंत्री झालो हे मान्य होत नाही. आजपर्यंत सर्व नेत्यांनी त्यांच्याबरोबर तडजोड केली असेल, पण या पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेव व्यक्ती आहे कधीही पवारांच्या पुढे झुकलो नाही आणि कधी झुकणारही नाही, माझं राजकारण संपलं तरी चालेल”, असे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “बारामतीच्या पुढे मी कधीही झुकलो नाही. बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र, आपल्या शेतात पाणी आलं नसतं. मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माण खटावच्या मातीत पाणी आलं नसतं. आज माण खटावच्या मातीत जी विकासाची गंगा वाहते ती कधीही वाहिली नसती. कारण बारामतीच्या दारात जाऊन बसण्याशिवाय माझ्या हातात काही राहिलं नसतं. मी एकमेव व्यक्ती आहे कधीही बारामतीची पायरी देखील चढलो नाही”, असे जयकुमार गोरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माण खटावच्या विकासकामांवरुन मंत्री जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “माझा विरोध त्यांना नाही, बारामतीला देखील माझा विरोध नाही. माझा विरोध हा ज्यांनी या मातीला, माण खटावला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोध आहे. माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानासाठी आहे. माझा विरोध बारामतीला किंवा पवारांना नाही”, असेही मत मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.
भाजप मंत्री जयकुमार गोरे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी चर्चेत आले होते. त्यांच्या एका महिलेला नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला. विरोधकांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यामुळे जयकुमार गोरे चर्चेत आले होते. त्यानंतर आता शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.