मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या प्रेसमधून पंतप्रधान मोदींच्या राजकीय वारसाबाबत वक्तव्य केले (फोटो - टीम नवराष्ट्र)
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.30) नागपूर दौरा केला. यावेळी त्यांनी संघ मुख्यालय असलेल्या रेशीमबागला आणि दिशाभूमीला भेट दिली. यावेळी संघामुळे गुलामीच्या बेड्या तुटल्या म्हणत पंतप्रधान मोदींनी संघकार्याचे मोठे कौतुक केले. तसेच सेवा कार्य आणि समाज कार्याबाबत कौतुक करत संघ हा वटवृक्ष असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता मात्र राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्या मेळाव्य़ाच्या भाषणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्य चांगल्या पद्धतीने चालवण्याचा निश्चितपणे आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत मत व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की,” राज ठाकरे यांचं पूर्ण भाषण मी ऐकू शकलो नाही. पण जेवढं काही ऐकलं त्यामध्ये ते काही महत्त्वपूर्ण मुद्दे बोलले आहेत. त्या मुद्द्यांवर निश्चितपणे आम्ही विचार करु. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.” असे मत फडणवीसांनी मांडले. तसेच “औरंगजेबाची कबर ही ASI ची प्रोटेक्टेड कबर आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो किंवा न आवडो कायद्याने 50 वर्षापूर्वी त्याला संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याठिकाणी जो कायदा आहे त्या कायद्याचे पालन करणं ही जबाबदारी आहे. मात्र हे निश्चित आहे की, औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण आम्ही होऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी महाराष्ट्रामधून असून त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांकडे इशारा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे मुळात काहीच कारण नाही. मोदी हे आमचे नेते आहेत. अजून पुढचे अनेक काळ ते काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की, 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडेच बघतो आहे. आमच्यासोबत पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीमध्ये वडील जीवंत असताना मुलांचा विचार होत नाही. करायचा देखील नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे. की वडील जीवंत असताना मुलाने अशाप्रकारचा विचार करायचा. त्यामुळे आता कोणचाही आणि कोणताही उत्तराधिकारी शोधणं ही वेळ आलेली नाही. असा प्रश्न देखील आता नाही. जोपर्यंत माझा विषय आहे. तर माझा याच्याशी संबंध देखील नाही,” असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजीनामा देण्यासाठी नागपूर दौऱ्यावर आले असल्याचा घणाघात केला होता. खासदार राऊत म्हणाले की, “संकेत स्पष्ट आहे, माहिती बाहेर येते सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे धोरण 75 वर्षीय झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्यांच्यामुळे सरसंघ चालकांनी त्यांना या त्यांच्या संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी ही चर्चा केली. दहा-अकरा वर्षांनी जाऊन नागपुरात सरसंघचालक यांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाही इतक्या वर्षात कधीच गेले नाही – ईश्वराचा देखील मृत्यू झाला. राम गेले, कृष्ण देखील एका बाणाने पारध्याच्या लोक सोडून गेले. प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागते. देव असो या मनुष्य असो. नरेंद्र मोदी यांचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल,” असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.