बुलढाण्यातील लोकांचं टक्कल पडण्याचं गुढ पंजाब-हरियाणात? अर्थशास्त्रज्ञ रणजित सिंह घुमान म्हणाले...
पंजाब आणि हरियाणाच्या गव्हामध्ये सेलेनियम प्रमाण अधिक असल्यामुळे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोकांमध्ये अचाणक टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. असा दावा डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केला होता. मात्र शेतकरी नेते आणि कृषी तज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पंजाबला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असं प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक रणजित सिंह घुमान यांनी म्हटलं आहे. पंजाबने हरित क्रांती आणली आणि अनेक दशके देशाला अन्नधान्य पुरवलं आहे. पंजाबमध्ये वापरला जाणारा आणि पिकवलेला गहू संपूर्ण देशात पाठवला जातो. जर यात काही समस्या असती तर त्याचा परिणाम प्रथम पंजाबमधील लोकांवर दिसून आला असता. हे कोणत्याही प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेचे संशोधन नाही तर केवळ एका व्यक्तीने केलेला दावा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले की, हा पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, आमचे केस लांब आणि जाड आहेत. जर असा गहू असता तर आपण सर्वात आधी प्रभावित झालो असतो. आजपर्यंत आपण असे काहीही ऐकले नाही.
खरं तर, बुलढाण्यातील ३०० ग्रामस्थांमध्ये अचानक टक्कल पडल्याचे वृत्त आल्यानंतर महाराष्ट्रातील डॉ. बावस्कर यांनी जानेवारीमध्ये स्वतःहून एक संशोधन केले होते, ज्यावर त्यांनी सुमारे ९२,००० रुपये खर्च केले होते. २५ आणि २६ जानेवारी रोजी त्यांनी बाधित गावांमधून रक्त, मूत्र आणि गव्हाचे नमुने गोळा केले. तथापि, या दाव्याबाबत, शेतकरी संघटना आणि कृषी तज्ञांनी आता डॉ. बावस्कर यांचा सिद्धांत नाकारला आहे आणि तो निराधार आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या पलीकडे असल्याचे म्हटले आहे.
कोरोना महामारीनंतर HMPV विषाणूने डोकं वर काढलेलं असताना महाराष्ट्रातील बुलढाण्यातील गावकऱ्यांचं एका नव्या व्हायरसनं टेन्शन वाढवलं आहे. अवघ्या तीन दिवसांत टक्कल पडत असून टक्कल बाधित लोकांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे गावातील लोकांची झोप उडाली आहे.
बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावातील नागरिक केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या वाढली आहे. या तालुक्यातील बाधितांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या लोकांना व्हायरसने ग्रासलं आहे. आज बुधवारी परिसरातील काही गावात २५ नवीन बाधित आढळल्याने बाधितांची संख्या वाढली आहे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली आहे. या आजाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.