'माधुरी ऊर्फ महादेवी' हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल
Mahadevi Elephant: शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठातील हत्तीणी ‘माधुरी उर्फ महादेवी’हिला गुजरातमधील वनतारा वन्यजीव छावणीत हलविण्यात आले आहे. वनतारा हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा वन्यजीव संवर्धन प्रकल्प असून, तो जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र मानला जातो.
माधुरीला रवाना करताना नांदणी गावकऱ्यांनी भावनिक निरोप दिला होता. तिला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. गावकऱ्यांनी माधुरी हत्तीणीला वनतारा अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. पण यानंतर कोल्हापुरसह राज्यभरात वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातून माधुरी हत्तीणीला परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हत्तीणी माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम उभारण्यात आली आहे. अनेक नेत्यांनी या विषयात आवाज उठवला आहे आणि नांदणी गावाला खुली मदतही जाहीर केली आहे. संस्थान मठाची परंपरा सुमारे १२०० वर्षांपासून सुरू असून, मागील ४०० वर्षांपासून मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे.
Manikrao Kokate : “मी अत्यंत खूश…! कृषी खाते काढून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले
एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे वनतारा प्रकल्पाचे सीईओ विवान करणी शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. ते महास्वामींना भेटण्यासाठी नंदणीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना तिथे न जाण्याची विनंती केली. परिणामी, ते काही वेळ कोल्हापूर विमानतळावर थांबले आणि पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींना कोल्हापूरमध्येच भेटण्याचं ठरवलं. या वेळी खासदार धैर्यशील माने आणि धनंजय महाडिक उपस्थित होते. दुपारपर्यंत चर्चेची मालिका सुरू होती.
जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन हत्तीणीबाबत जनभावना व्यक्त केली. शिंदे यांनी पुढाकार घेत अनंत अंबानी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये चर्चेसाठी दाखल झाले आहेत. मठाधिपतींसोबत चर्चा करून तोडगा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गणेशमूर्तींचा बदलता साजशृंगार; बालगणेश, वारकरी अन् फेटे-पगड्यांनी सजलेल्या मूर्तींना वाढती मागणी
कोल्हापूर जिल्ह्यातील मठात मागील अनेक वर्षांपासून राहणारी ३६ वर्षीय हत्तीणी ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ भावनिक निरोपानंतर 30 जुलैला गुजरातमधील जामनगर येथील राधे कृष्ण हत्ती कल्याण ट्रस्टच्या वनतारा प्राणी कल्याण केंद्रात पोहचवण्यात आले. न्यायालयीन अहवालानुसार, कोल्हापुरातील मठात असताना महादेवीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची स्थिती खालावली होती. तिच्या शरीरावर अल्सरसारख्या गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. परिणामी, तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुनर्वसनासाठी योग्य पावले उचलण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
महादेवी राहत असलेल्या मठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. उच्चाधिकार समिती (HPC)च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले की, हत्तीणीला उत्तम अन्न, निगा, नैसर्गिक निवारा आणि सामाजिक वातावरण आवश्यक आहे, जे वंटारामध्ये पुरवले जाऊ शकते. त्यानंतर कोल्हापूरच्या नांदणी गावात, मठातील भक्त आणि जवळच्या ग्रामस्थांनी महादेवीला निरोप दिला. गावकऱ्यांसाठी हा एक भावनिक क्षण होता, कारण त्यांनी अनेक वर्षांपासून महादेवीशी एक विशेष नाते निर्माण केले होते. पूजा झाल्यानंतर, लोकांनी हत्तीणीला आशीर्वाद दिला आणि ओल्या डोळ्यांनी तिला निरोप दिला.