चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुरंदर विमानतळावर भाष्य (फोटो - सोशल मिडिया)
पुरंदर: सध्या राज्यात पुरंदर विमानतळाचा प्रश्न गाजत आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण आणि एखतपूर गावच्या दरम्यान ड्रोन सर्व्हेसाठी अधिकारी गेले असता स्थानिक शेतकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे समोर आले. दरम्यान आज राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुरंदर विमानाबाबत बोलताना म्हणाले, “पुरंदर विमानाच्या भूसंपादनाला विरोध असणाऱ्यांशी चर्चा केली. पुरंदरचे विमानतळ आमचे सरकार करणार म्हणजे करणारच आहे. तिथे विरोध आहे हे खरे. पण शेतकऱ्यांची समजूत घालण्याचे, त्यांना विकासाचे महत्व पटवून देण्याचे, त्यांच्या पुनर्वसनाचे तसेच भूसंपादनातील अडचणी सोडवण्याचे काम आम्ही नक्कीच करू, असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
ते म्हणाले की पुणे शहर व जिल्हयाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने जागरुक आहेत. पुण्याच्या रिंगरोडसाठी अलिकडेच आम्ही 34 हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली. पुणे शहर व जिल्ह्यासाठी चागंल्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष असतेच असे सांगताना बावनकुळे म्हणाले की पुण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयाचा एक कोपरा सदैव जागा आहे!
वरिष्ठ पत्रकारांशी गप्पा मारताना श्री बावनकुळे म्हणाले की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सदस्य नोंदणीचे मोठे काम केले आहे. आज आम्ही दीड कोटी सदस्यांचा आकडा गाठला आहे. त्यातील एक लाख 49 हजार हे सक्रीय कार्यकर्ते असून 1280 मंडलांचे प्रमुख कार्यकर्ते नेमले गेले आहेत. मंडल, तालुका व जिल्हास्तरीय अध्यक्षांच्या नियुक्त्या आता पूर्ण झाल्या आहेत. माझ्यासाठी ही समाधानाची बाब आहे.
पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण आणि एखतपूर गावच्या दरम्यान ड्रोन सर्व्हेसाठी अधिकारी गेले असता स्थानिक शेतकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात जोरदार बाचाबाची सुरु होती. त्याच दरम्यान कुंभारवळण येथील अंजना महादेव कामथे या महिलेचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यातच एखतपूर येथील एक महिला जखमी झाली. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. आता आमच्या प्रेतावरूनच विमानतळ प्रकल्प करा, अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक; ड्रोन सर्वे स्थगित करण्याचे अजित पवारांचे आदेश
दरम्यान याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुणे येथे एका कार्यक्रम दरम्यान पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता आजच्या दिवसापुरता ड्रोन सर्व्हे रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर पुरंदरचा विमानतळ प्रकल्प आवश्यक असून, शेतकऱ्यांना कोणताही त्रास न देता त्यांना विश्वासात घेवूनच प्रकल्प करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.