निवडणूक स्वतंत्र की युतीमधून लढायचे?उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार घोषणा (संग्रहित फोटो)
सासवड : पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण आणि एखतपूर गावच्या दरम्यान ड्रोन सर्व्हेसाठी अधिकारी गेले असता स्थानिक शेतकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात जोरदार बाचाबाची सुरु होती. त्याच दरम्यान कुंभारवळण येथील अंजना महादेव कामथे या महिलेचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यातच एखतपूर येथील एक महिला जखमी झाली. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. आता आमच्या प्रेतावरूनच विमानतळ प्रकल्प करा, अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुणे येथे एका कार्यक्रम दरम्यान पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता आजच्या दिवसापुरता ड्रोन सर्व्हे रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर पुरंदरचा विमानतळ प्रकल्प आवश्यक असून, शेतकऱ्यांना कोणताही त्रास न देता त्यांना विश्वासात घेवूनच प्रकल्प करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्थानिक अधिकाऱ्यांना फोन झाल्यानंतर पोलीस माघारी परतत असताना पोलिसांनी प्रथम शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे परिस्थिती भयाण झाली आणि शेतकऱ्यांनी थेट पोलिसांच्या गाड्यांवर शेतातील मातीचे गड्डे आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना समजून न सांगता जोरदार लाठीहल्ला करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये जखमी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलेच्या निधनामुळे ड्रोन सर्व्हे तात्पुरता रद्द केल्याचे सांगितले आहे, त्यामुळे हा सर्व्हे कायमचा रद्द झाला नसून, येत्या एक दोन दिवसांत पुन्हा सुरु होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून बैलांना मारहाण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
दरम्यान कुंभारवळण एखतपूर रस्त्यावर शेतकऱ्यांनी बैलगाड्या उभ्या करून पोलिसांचा रस्ता अडविला. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांत बाचाबाची सुरु होती. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने गाडीच्या बैलाला काठीच्या सहाय्याने मारहाण केल्याचा आरोप करून शेतकरी आक्रमक झाले. त्यातून संबंधित पोलीस कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.