छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त लिखाणासाठी विकीपिडीयावर होणार कारवाई (फोटो सौजन्य - Pinterest)
ओपन-सोर्स प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या वादग्रस्त मजकुराच्या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल विकिपीडियावरील त्या मजकुराच्या संपादकांवर एफआयआर दाखल करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाला मजकूर काढून टाकण्याबाबत १० हून अधिक ईमेल पाठवले होते परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
तसंच सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार, विकिपीडियावरून फक्त स्वयंचलित उत्तर आले परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. विकिपीडियाने लिहिण्यात आलेला तो मजकूर काढून टाकला नाही किंवा पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. याशिवाय, विकिपीडियाने IT कायद्याच्या कलम ६९ आणि ७९ चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणात, विकिपीडियाच्या ४-५ संपादकांविरुद्ध एफआयआर दाखल केला जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू
खरंतर, हे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उचलण्यात आले आहे. संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर असलेल्या आक्षेपार्ह माहितीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर सेलला सूचनाही दिल्या होत्या. त्यांनी म्हटले होते की ते ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर असे लेखन सहन करणार नाहीत. ज्यामध्ये तथ्ये विकृत पद्धतीने सादर केली जातात.
संभाजी महाराजांवर नुकताच प्रदर्शित झाला चित्रपट
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या लाँचपासूनच छत्रपती संभाजी महाराजांचा मुद्दा चर्चेत आहे. महाराष्ट्रात या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे कारण महाराष्ट्रात मराठा राज्यकर्ते छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना आपले आदर्श मानतात आणि त्यांची पूजा करतात. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर विकिपीडियावरील मजकुरावरील वाद निर्माण झाला आहे.
एफआयआर करून कारवाई
लवकरच विकीपीडियाच्या संपादकांवर एफआयआऱ दाखल होणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. तर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले असल्याचेही दिसून येत आहे. याकडे दुर्लक्ष न करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी तात्काळ पावले उचलत कारवाई करण्याची सूचना दिली आहे आणि त्यानुसार प्रशासन कामाला लागल्याचेही दिसून येत आहे. याशिवाय लवकरच याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासनही काल मुख्यमंत्री यांनी दिले होते. यानुसार पोलिसांनी आपले काम तात्काळ करायला सुरूवात केली आहे.