नवीन पाणी योजना पूर्ण, तरी शहरभर पाणी वितरण अर्धवट (Photo C redit - X)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू असलेली नवीन पाणीपुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरअखेरपर्यंत २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) वाढीव पाणी शहरात येणार आहे. जायकवाडी येथील जॅकवेल आणि मोटार बसविण्याचे काम नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, पाणी शहरात दाखल होऊनही नागरिकांना त्याचा त्वरित लाभ मिळणार नाही, कारण शहरभर अंतर्गत पाइपलाइन टाकण्याची कामे अजूनही अर्धवट आहेत.
अंतर्गत पाईपलाईनचे जाळे अपूर्ण असल्याने ‘नो नेटवर्क झोन’ मधील नागरिकांना जारच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. केंद्राच्या अमृत २ योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (MJP) हा प्रकल्प जीव्हीपीआर (GVPR) कंपनीकडे आहे. २५०० मिमी व्यासाची, ३९ किमी लांबीची मुख्य जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आली आहे. यावर १२ ठिकाणी जोडणीचे काम बाकी आहे.
एकूण २ हजार किमी पाईपलाईन टाकायची आहे, त्यापैकी सुमारे ११०० किमी काम पूर्ण झाल्याचा दावा आहे. मात्र, कोणत्या वसाहतींचे काम पूर्ण झाले, याची स्पष्ट माहिती एमजेपी किंवा महापालिकेकडे उपलब्ध नाही. ९०० मिमी व्यासाच्या पाईपलाईनचे दूध डेअरी चौक ते एसएफएस शाळेपर्यंतचे काम सध्या ठप्प आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नव्या योजनेमुळे सातारा-देवळाई परिसराला पाणीपुरवठा सुरू करता येईल. परंतु, इतर ‘नो नेटवर्क झोन’ मधील वसाहतींना पाणी केव्हा मिळणार, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. कामाच्या संथ गतीमुळे आश्वासने मिळूनही नळजोडणी न झाल्याने लोकांमध्ये असंतोष वाढत आहे. वाढीव पाणी केवळ आकड्यांपुरतेच न राहता, संपूर्ण शहरात त्याचे वितरण व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.






