वीजग्राहकांसाठी दिलासा! 'टीओडी मीटर'मुळे ७५ लाखांची बचत (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर: काही घटकांकडून विरोध होत असला तरी अनेक वीजग्राहक टिओडी (टाइम ऑफ डे) वीजमीटरला पसंती देत आहेत. टीओडी मीटर बसवलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १ लाख ८७ हजार घरगुती ग्राहकांना गेल्या चार महिन्यांत ७५ लाख रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे. त्यामुळे मीटर बसवण्याकामी ग्राहकांनी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
१ जुलै २०२५ पासून महावितरणच्या स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर टीओडी सवलत लागू झाली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरु झाला आहे. विशेष म्हणजे, महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टीओडीनुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तसेच २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.
प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर परिमंडलात १ लाख ८७ हजार ७८ घरगुती ग्राहकांना वीजबिलात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत ७५ लाख २० हजार ४३७ रुपयेांची टीओडी सवलत मिळाली आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. त्यामुळे अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Vaijapur: साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय! वैजापूर बसस्थानकातील घटनेने दिला संदेश






