छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई;
शहानुरमिया दर्गा चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून, गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत चौपाटी उभारण्यात आली होती. पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या चौपाटीत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, लहान दुकाने आणि फळविक्रेते यांची गर्दी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढत गेल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा तक्रारी होऊनही कारवाई लांबणीवर पडत होती.
महापालिका प्रशासनाने अलीकडे अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू करत या परिसरावर लक्ष केंद्रीत केले. संबंधित व्यावसायिकांना अतिक्रमण स्वखर्चाने काढून घेण्याची सूचना आधीच देण्यात आली होती. काहींनी आपले साहित्य काढून घेतले; मात्र मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कायम असल्याने अखेर मनपाने थेट कारवाईचा निर्णय घेतला.
गुरुवारी अतिक्रमण हटाव पथक शहानुरमिया दर्गा चौकात दाखल झाले. पाच जेसीबी, एक पोकलेन, पाच टिप्पर आणि सुमारे शंभर कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते. संबंधित झोन कार्यालयातील अधिकारी, इमारत निरीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलिस बंदोबस्तात कारवाईस सज्ज झाले. सुरुवातीला रस्त्यालगत असलेली हॉटेल्स, फळविक्रेते आणि लहान दुकाने हटवण्यात आली. त्यानंतर मुख्य लक्ष चौपाटीवर केंद्रित करण्यात आले. काही वेळातच जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण संरचना जमीनदोस्त करण्यात आली.
मनपाच्या पथकाने केवळ चौपाटीपुरती कारवाई न थांबवता, पुढे शहानुरमिया दर्गा चौक ते आनंद गाडे चौक या मार्गावरील लहान-मोठी अतिक्रमणेही हटवली. यामुळे संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर शहानुरमिया दर्गा चौकातील दोन्ही बाजूंनी रस्ते मोकळे झाले आहेत. यामुळे वाहनांची रहदारी सुरळीत होण्यास मदत झाली असून, परिसरातील दीर्घकालीन वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कारवाई सुरू असताना काही नागरिकांनी एकत्र येत विरोध करण्याचा प्रयत्न केला. हुल्लडबाजीची चिन्हे दिसू लागल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. विरोध करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज करून जमाव पांगवण्यात आला. त्यामुळे पुढील कारवाई कोणत्याही डथळ्याविना पूर्ण झाली.
शहानूरमियाँ दर्गा चौकातील चाँद पाशा सय्यद यांनी अतिक्रमण पथकास शिवीगाळ करून अंगावर धावून गेले. याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा अतिक्रमण केल्यास आणखी गुन्हे होऊ शकतात.
अतिक्रमण हटवल्यानंतरही संबंधितांनी पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा अतिक्रमण नियंत्रण विभागाने दिला आहे. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.






