नव्या मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा जुन्या सरकारवर टोला (Photo Credit - X)
उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे नाव बदलण्याचे निर्देश दिले. “नथिंग इज मिसिंग, त्यामुळे याला मिसिंग लिंक न म्हणता ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणा,” असे त्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना सुचवले. हा प्रकल्प मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी फोडण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
LIVE | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण 🕑 दु. १.५९ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड.#Maharashtra #MaharashtraDay #MumbaiPuneMissingLink https://t.co/zCNY972DmQ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2026
उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली. “आज एक्सप्रेसवेवर जे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्यांची मी क्षमा मागतो,” असे ते म्हणाले. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत त्यांनी टोला लगावला की, “सुप्रियाताई, आज तुम्ही शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. तुमच्या सरकारने जे काम थांबवलं होतं, ते आमच्या सरकारने पूर्ण केलंय. आता तुम्ही पुण्याला जाताना कधीच अडकणार नाही”.
हा केबल-स्टे पूल आंतरराष्ट्रीय सहकार्यातून साकारला असून यात सात देशांचे तांत्रिक योगदान आहे. डिझाइन कॅनडा आणि आलेखन तैवानमध्ये करण्यात आले. तर चाचण्या डेन्मार्कमध्ये महत्त्वाच्या चाचण्या तर स्पेनमध्ये अग्निशमन सुरक्षा चाचण्या पार पडल्या. तसेच साहित्य व तज्ञ मलेशियातून केबल्स आणि सिंगापूरमधून तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. हा पूल ताशी २४० किमी वेगाच्या चक्रीवादळालाही तोंड देण्यास सक्षम आहे, ज्यामुळे निसर्ग वादळासारख्या संकटातही तो पूर्णतः सुरक्षित राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुलाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. २४ तास सीसीटीव्ही देखरेख, विशेष व्हेंटिलेशन प्रणाली यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच लेन शिस्त पाळणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन केल्यास चलान आकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळातील आव्हाने पेलत हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या मजूर आणि इंजिनीअर्सच्या श्रमाचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली आणि सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान बांधण्यात येणारा हा नवीन मार्ग आधुनिक बोगदे आणि उड्डाणपूल वापरून तयार केला जाईल. अवघड घाट विभागाला वळसा घालून प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रकल्पात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डोंगरांमधून खोदलेले लांब बोगदे आणि खोल दऱ्यांवर बांधलेले भव्य पूल या प्रकल्पाला देशातील सर्वात आव्हानात्मक रस्ते बांधकाम प्रकल्पांपैकी एक बनवतात.






