सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आळंदी, देहूपासून नीरा नदीपर्यंतच्या पालखी मार्गावर शहरी तसेच ग्रामीण भागात उभारण्यात येणाऱ्या स्वागत मंडपाला यंदा परवानगी देऊ नका. या स्वागत मंडपामुळे वारकऱ्यांना चालवण्यात अडथळा निर्माण होत असल्याची पालखी सोहळा प्रमुखांची तक्रार गांभीर्याने घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच दिंडीकऱ्यांच्या वाहनांना रथाच्या प्रस्थानापूर्वीच जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा असेही फडणवीस सांगितले आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंडप रस्त्यात उभे राहणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दरम्यान हडपसर ते दिवे घाट दरम्यान खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
पुण्यातील विधानभवन येथे वारी सोहळा आढावा बैठकीत, पालखी मार्गावरील स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या कमानी तसेच या वारकऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार देहू तसेच आळंदी सोहळा प्रमुखांनी केली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आषाढी वारीसंदर्भात आढावा बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली होती. तेव्हा याबाबत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश डुडी यांना दिले आहेत.
दिंडीकऱ्यांच्या वाहनांना वाहतूक विभागाकडून ठराविक वेळेतच पालखी मार्गावरून न सोडता ही वाहने रथ मार्गस्थ होण्यापूर्वीच सोडण्यात यावीत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत असेही सांगितले आहे. त्याचप्रमाणे आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची पुरेशी संख्या ठेवावी असे निर्देशही दिले. याच बैठकीत आषाढी वारीसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या दिंड्याबाबत संबंधित जिल्ह्यांमध्ये बैठका होत नसल्याची तक्रार करण्यात आली त्यानंतर या जिल्ह्यांनी संबंधित दिंड्यांच्या तक्रारी संदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंडप रस्त्यात उभे राहणार नाहीत, यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. यंदा मान्सून लवकर दाखल झाला असल्याने पेरण्या लवकर उरकतील, त्यामुळे या वर्षी वारकरी मोठया संख्येने आषाढी वारीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यानुसारच जिल्हा प्रशासनाने २० लाख वारकऱ्यांच्या सोयीसाठीचे नियोजन केले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी मार्गासंदर्भात मंगळवारी पाहणी केली. त्यात हडपसर ते दिवे घाट हा रस्ता या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू आहे. वारीपूर्वी हे काम संपणार नसल्याने तात्पुरता उपाय म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स डांबराचा वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वारीच्या काळात रस्त्यात असलेली यंत्रे तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्याचे संबंधितांना सांगितले आहे. पाऊस उघडल्यानंतर तीन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम करावे, अशा सक्त सूचनाही डुडी यांनी दिल्या आहेत.