सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, सूचक वक्तव्यही येतायत. यावरुन आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात किती संवाद आहे हे मला माहीत नाही, त्यामुळे ‘बेगानी शादी में… मला ‘अब्दुला दिवाना व्हायचे नाही’, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर व्यक्त केली. इथेनॉल मॅन डॉ. प्रमोद चौधरी लिखीत ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘ते दोन पक्ष आहेत, दोन भाऊ आहेत. मी उत्तर दिले नाही तरी तुमची पतंगबाजी चालू राहील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये किती संवाद आहे मला माहीती नाही. तुमची उत्सुकता अधिक आहे. माध्यमांचा उतावळेपणा सुरु आहे. मला प्रतिक्रीया द्यायची नाही. त्या दोन बंधूंनी एकत्र येण्यावरून मत व्यक्त करून हात दाखवून अवलक्षण करायचे नाही.’’
उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन करणार का?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत. त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच ठाकरे गटासमोर सर्वात मोठी अट ठरली आहे. आम्हाला दोनवेळेचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पित आहोत. ठाकरे गटाला आमच्यासोबत युती करायची असेल तर आमच्याकडे रितसर प्रस्ताव द्या किंवा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना फोन करावा. त्यानंतर राज ठाकरे काय तो निर्णय घेतील, अशी अटच मनसेने ठेवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरेंना फोन करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.