नवी मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) काही दिवसांपूर्वी घोषित झाला आहे. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM) यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेत, त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर आता ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार १६ एप्रिल (रविवारी) म्हणजे आज खारघरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून, शहांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा देखील घेतला आहे. बालसंस्कार बैठका ते व्यसनमुक्ती, महाराष्ट्राला संस्कार देणाऱ्या घराण्याचा हा गौरव होत आहे. पित्यानंतर पुत्रालाही महाराष्ट्र भूषण मिळत असल्यानं धर्माधिकारी यांच्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी?
डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्षे निरुपण करत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठकी सुरू केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे कार्यही केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडे संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जाते. निर्माल्यातून खतनिर्मिती करून पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.
20 लाखांपेक्षा अधिक लोकं येणार…
दरम्यान, या कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला साधारण 20 लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याचे नियोजन नीट असावे, सुरक्षा कटेकोट असावी, पोलिस बंदोबस्त तैनात असावा, आदीच्या तयारीची बैठक घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळं या कार्यक्रमाला राज्यभरातून धर्माधिकारी यांचे अनुयायी येणार आहेत.
कार्यक्रमावर भाजप-शिंदे यांचंच वर्चस्व?
दरम्यान, हा कार्यक्रम भाजप व शिंदे गटाने हायजॅक केल्याचे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन स्पष्ट होते. कारण या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसमधी एकाही नेत्यांचे, खासदाराचे किंवा आमदाराचे नाव टाकलेले नाही. एकिकडे हा कार्यक्रम शासकीय असल्याचं सांगण्यात येतंय, मग असं असताना राजशिष्टाचार म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावे असणे हे क्रमप्राप्त होते, मात्र या दोघांचीही नावे नाहीत, त्यामुळं हा कार्यक्रम फक्त शिंदे गट व भाजपाचाच आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
निमंत्रणपत्रिकेत कुणाला स्थान
कार्यक्रमाच्या या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे असणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाना प्रथम स्थान देण्यात आलं आहे. यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवर, मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, शेकापचे आमदार जयंत पाटील, निरंजन डावखरे, शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले, रायगडचे आमदार अनिकेत तटकरे तसेच प्रशांत ठाकूर यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. सध्याचे राजकारण पाहत, व राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपासोबतचे सख्य पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत, मात्र काँग्रेस किंवा ठाकरे गटातील एकाही नेत्याचे, पदाधिकाऱ्याचे, आमदार किंवा खासदाराचे नाव नसल्यानं आश्चर्य व्य़क्त केलं जात असून, या कार्यक्रमाच्या या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.