गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण तापलं
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण चांगलंच तापले आहे. गोकुळ दूध संघातील सत्तेच्या चाव्या महायुतीकडे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. गोकुळ संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने २५ वर्षांची महाडिकांची सत्ता घालवून मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये वर्चस्व निर्माण केलं होते. मात्र, निवडणुकीनंतर चार वर्षांनी आता महायुतीचाच अध्यक्ष व्हावा, यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा बसला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, “गोकुळच्या आज होणाऱ्या संचालक मंडळ बैठकीत मी सहभागी होणार नाही. मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे. मात्र आपण अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच आपण राजीनामा देणार नाही. तर मी अध्यक्षपदासाठी आग्रही नाही. मात्र होणारा नवीन अध्यक्ष महायुतीचाच असावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यामुळेच आज राजीनामा देऊ नका अशा सूचना मला दोन्ही नेत्यांनी सह्याद्रीवर बोलवून दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या मदतीशिवाय गोकुळ सारख्या मोठ्या संस्थेमध्ये काही करता येत नाही. सरकारच्या विरोधात गेल्यास गोकुळला अडचणी येऊ शकतात. त्यामुळं मी महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणार आहे, ” असं अरुण डोंगळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. “गोकुळमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत. त्या अत्यंत सकारात्मक आहेत. त्यावर भाष्य करणं योग्य नाही, यापूर्वी महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात संघ २५ वर्ष होता आणि चांगल्या पद्धतीनं सुरू होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तथाकथित काही मंडळींनी एकत्र येऊन आमच्या विरोधात पॅनेल उभं केलं. एकत्रित येऊन निवडणूक लढवली आणि संघ त्यांच्या ताब्यात गेला. सध्या गोकुळमध्ये कसा कारभार सुरू आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. राज्यात महायुतीचा सरकार आहे. त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष व्हावा, अशी माझी इच्छा आहे. यापूर्वी महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी एकत्र येत गोकुळ चांगल्या पद्धतीनं चालवलं.
मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर येथील माजी पालकमंत्र्यांनी शक्कल लढवत माजी मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन महाविकास आघाडीचे पॅनल बनवलं. त्यामुळं आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा, ही सगळ्यांची भावना आहे. गोकुळच्या मागे आणखी काही अदृश्य शक्ती आहेत, ज्या दिसत नाहीत. गोकुळचं राजकारण आणि शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला निर्णय होईल. गोकुळ संदर्भात आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, ” असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. आज कोल्हापुरातील गोकुळच्या मध्यवर्ती इमारतीत सत्ताधारी संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीला सत्ताधारी गटाचे २० संचालक उपस्थित होते.
विरोधी बाकावरील शौमिका महाडिक यांच्यासह डॉ. चेतन नरके, बाबासाहेब खाडे हे संचालक गैरहजर राहिले. यामुळे एकीकडं संचालक तर दुसरीकडे एकटे पडलेले अध्यक्ष अरुण डोंगळे अशी परिस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी अध्यक्ष अरुण डोंगळे यांना नेमका काय शब्द दिला आहे? याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, आज होणाऱ्या संचालकांच्या बैठकीला अरुण डोंगळे गैरहजर राहिले. यामुळे महायुतीचा अध्यक्ष होणार, याचा मार्ग सुकर झाला आहे. २१ संचालक असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये सध्या महाविकास आघाडीकडे ८, महायुतीकडे १० तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे ३ संचालक आहेत. त्यामुळं गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार, यावर थोड्याच दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे.