नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर उभारले जाणार (फोटो- ट्विटर)
नागपूर: पार्टीकल ॲक्सीलरेटर (कण त्वरक) तंत्रज्ञान पूर्वी संशोधनापुरतेच मर्यादित होते. आता ते कॅन्सर सारख्या आजारावर उपचार तसेच शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखासह एक सामाजिक गरज झाली आहे. भारतात सद्यस्थितीत अवघी 24 सायक्लोट्रॉन केंद्र कार्यान्वित असून पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत विचार करता आणखी एक हजार केंद्राची आवश्यकता आहे. नागपूर येथे विविध वैद्यकीय व अभियांत्रिकी पायाभूत संस्था असून सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृतीगट स्थापण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याचबरोबर या प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नागपूर येथे सायक्लोट्रॉन केंद्राच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल, प्रो.किशोर भूरचंडी, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, आयजीएमसीचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाण, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे संचालक वैद्यकीय संचालक डॉ.आनंद पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर उपस्थित होते.
नागपूरमध्ये व्हीएनआयटी, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या आरोग्य क्षेत्रातील नावाजलेल्या पायाभूत संस्था आहेत. यादृष्टीने विचार करता हे केंद्र नागपूरसह मध्यभारतासाठी महत्वाचे ठरेल. या केंद्राद्वारे क्लीन एनर्जी, जलशुद्धीकरण, आरोग्य, ऊर्जा अन्य प्रक्रिया सारख्या औद्योगिक क्षेत्राची नवी दालने सक्षम होण्यास मदत होईल, असे एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सादरीकरणात सांगितले.
संशोधन, वैद्यकीय क्षेत्रासह कॅन्सरवरील उपचार, भौतिक विज्ञान व अभियांत्रिकी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरेल, असे व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल यांनी सांगितले. मध्य भारतातील आवश्यक अशा या केंद्राच्या उभारणीसाठी व्हीएनआयटी सर्वतोपरी योगदान देईल. व्हीएनआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या क्षेत्रात रस घेणारे संशोधक पुढे आले आहेत. असे श्री. पटेल यांनी सांगितले. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद पाठक यांनी मध्य भारतासह विदर्भ-मराठवाड्यातील कॅन्सर रुग्णांना याद्वारे होणाऱ्या लाभासंदर्भात सादरीकरण केले.
पुणे शहरातील ट्रान्सपोर्ट गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे शहरात वाहतूक कोंडी ही खूप मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच तर पुणे शहरातील ट्रान्सपोर्ट गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा, असा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पुणे शहरातील ट्रान्सपोर्टच्या गतिमानतेसाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिला. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा, तसेच यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. याव्यतिरिक्त, पुणे शहरातील विविध विकासात्मक योजना हाती घेण्यात आल्या, ज्या पुण्यासोबत नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरतील.