सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे. माणिकराव कोकाटेंवर आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे क्रीडामंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रीपद देण्यात आले आहे. ऑनलाईन रम्मी खेळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यावरुन आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने काल निकाल दिला असला तरी खरा निकाल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच दिला होता, हे यानिमित्ताने खेदाने नमुद करावे वाटते. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो व रंगही नसतो पण भाजपा दहशतवादाला रंग देऊन त्यांचा अजेंडा राबवत आहे. तर खोटारडेपणा व दुटप्पीपणा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाचे पैलू आहेत. मालेगावच्या निकालावर प्रतिक्रीया देताना त्यांनी मंत्रीपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. एका घटनेला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय हे नैतिकता व शपथेला धरून नाही. फडणवीस यांनी नैतिक व संविधानिक मुल्ये पाळली नाहीत त्यामुळे ते अधर्मी आहेत.
सामाजिक विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवला, या प्रश्नाचे उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत त्यामुळे ते चुकीचीच कामे करणार. सामाजिक न्याय विभाग वा आदिवासी विभागाचा निधी हा कोणत्याही परिस्थितीत दुसरीकडे वळवता येत नाही पण सरकार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असून संविधानाची पायमल्ली करत आहे.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जे लोक पक्ष सोडून जात आहेत त्यांची चर्चा होत होती पण ज्या पक्षात जायचे त्यांच्याशी योग्य सौदा काही होत नव्हता आता सौदा झाल्याने ते गेले असतील. याला गळती म्हणणे चुकीचे ठरेल, काँग्रेस हा विचार धारेवर चालणारा पक्ष आहे, कोणाच्या जाण्याने पक्ष कमजोर होत नाही, ५०-५० वर्ष एकाच कुटुंबात पक्षाची पदे दिली गेली आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. जे गेले त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे, असेही सपकाळ म्हणाले.