सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील निवडणुकांत मतांची चोरी झाल्याच्या आरोपाचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला. निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्रातील मते चोरली अशी आमची पक्की खात्री आहे’, असा आरोप राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘न्यायव्यवस्थेने या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण ज्या लोकशाहीवर आपण इतके प्रेम करतो, ती आता अस्तित्वात नाही’, असे राहुल यांनी अधोरेखित केले. राहुल गांधींच्या आरोपानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तासभर चक्काजाम करण्यात आला, या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. या आंदोलनाआधी टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला.
सपकाळ म्हणाले, राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असे सपकाळ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’! – हर्षवर्धन सपकाळ
निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेंव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळ दाखवला त्यातून निवडणूक आयोग बरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भिती देवेंद्र फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची फडफड होत असावी, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने मतदानावेळीच हरकत का घेतली नाही, या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाकडून असे प्रश्न उपस्थित करून भ्रम पसरवला जात आहे. मतदानावेळी व त्यांनतरही काँग्रेसने आक्षेप घेतलेले होते व हरकतीही उपस्थित केल्या आहेत. पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाला भेटून घोटाळाचे पुरावेही त्याचवेळी दिले आहेत पण भाजपा केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे.
मतचोरीविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार
मतचोरी विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आंदोलन करणार आहे. रॅली काढून, पदयात्रा व यात्रा अशा विविध प्रकारे हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती सपकाळ यांनी दिली.