संग्रहित फोटो
मुंबई : देशातील डाव्या विचारांचा शेवटचा गड मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये आज ऐतिहासिक सत्तांतर होताना दिसत आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने स्पष्ट बहुमत ओलांडले असून, डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला मोठा धक्का बसला आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर केला पण दक्षिण भारतातील जनतेने भाजपाच्या विषारी, विखारी व देश तोडणारा विचार व नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वही नाकारले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्व मर्यादा, परंपरा, नियम यांना धाब्यावर बसवले. एनआयए, सीआरपीएफ, एन्काउटर स्पेशालिस्ट अधिकारी पश्चिम बंगालमध्ये पाठवून दडपशाहीचा वापर केला. पुन्हा एकदा भाजपाने गैरप्रकार करून पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला आहे पण भाजपाची ही विषारी ताकद दक्षिण भारतात मात्र चालली नाही व मोदींचे नेतृत्वही चालले नाही.
केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही व संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. देशाला काँग्रेसचा विचारच तारणारा असून केरळच्या विजयाने काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे, ही ऊर्जाच काँग्रेसला आगामी काळात बळ देणारी ठरेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार
सध्या देशातील राजकारणातील महत्त्वाची राज्य असलेल्या पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. या पाच राज्यातील एकूण ८२४ जागांची मतमोजणी केली जात आहे. यातील बहुतांश जागांवर भाजपने आपल्या विजयाची पताका फडकवली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनपेक्षित मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर आसाममध्ये आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. या विजयामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. या निवडणुकांमध्ये सर्वात मोठे लक्ष पश्चिम बंगालकडे लागले होते. ताज्या माहितीनुसार, भाजपने पश्चिम बंगालमध्ये १७५ हून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अनेक दशकांपासून प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व असलेल्या या राज्यात भाजपने मिळवलेले हे यश ऐतिहासिक मानले जात आहे. राज्याच्या राजकारणात झालेला हा सत्तापालट भविष्यातील राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार आहे.






