'आमच्याकडे या CM व्हा', या पक्षाच्या नेत्याने दिली अजित पवार, शिंदेंना खुली ऑफर
विधानसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीला गळती लागली आहे. अनेक नेते कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. ऑपरेशन टायगरचीही जोरदार चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांकडून मोठ्या प्रमणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला जात आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीय. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. नाना पटोले यांनी सत्ताधारी नेत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खास पद्धतीत होळीच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी काँग्रेसमध्ये या आणि सीएम व्हा! अशी ऑफर पटोलेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना दिलीय.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. त्यानंतर थेट मुख्यमंत्री व्हावं, अशी राजकीय होळीची ऑफर पटोलेंनी दिलीय. त्यामुळे जर दोन्ही नेत्यांनी ही ऑफर स्विकारली तर महायुती सरकार एकाच झटक्यात कोसळू शकतं. दरम्यान ही ऑफर देत असताना नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना डिवचलंय. महायुती सरकारमध्ये दोन्ही नेत्यांची अवस्था खराब झालीय.
भाजपचे मित्रपक्षांचे नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे खूप त्रासलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व कारभार हा मुख्यमंत्री कार्यालयातून चालवला जाणार असल्याचा संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. फडणवीस दोन्ही नेत्यांना संपवण्याचं काम करत आहे. त्यामुळे माझी दोन्ही नेत्यांना खुली ऑफर आहे. जर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर आम्ही दोघांना मुख्यमंत्री बनवू. दोन्ही नेत्यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवू, असं नाना पटोले म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. ते खोटं बोलतात असा आरोप नाना पटोलेंनी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस हे आमचे मित्र आहेत, ते सर्वांनाच माहिती आहे. त्यांना शुभेच्छा देतो, पण अलीकडच्या काळात फडणवीस खूप फेकत आहेत. खोट बोलतात पण मित्रांनी खोटं बोलू नये, असंही पटोले म्हणालेत.